बेळगाव
हिजाब-भगवी शाल यावरुन कर्नाटकात सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या गोमटेश्वरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱया म्हैसूर येथील आयुबखान याच्यावर बेळगाव येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सध्या शिक्षण संस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना आयुबखानने गोमटेश्वरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरुद्ध बेळगावसह संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. म्हैसूर येथे यापूर्वीच एक एफआयआर दाखल झाला आहे.
अभय अवलक्की यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भा.दं.वि. 295-ए अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वारंवार गोमटेश्वरांचा अपमानास्पद उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.