गुजरातच्या शाळेत ‘माय आयडियल नथुराम गोडसे’ विषयावर स्पर्धा ः अधिकारी निलंबित
वृत्तसंस्था / वलसाड
महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेवरून गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. वलसाडच्या एका खासगी शाळेत वादविवाद स्पर्धेत मुलांसाठी निश्चित केलेल्या तीन विषयांमध्ये ‘माय आयडियल नथुराम गोडसे’ हा विषयदेखील समाविष्ट होता. सोमवारी पार पडलेल्या या स्पर्धेत पहिले बक्षीस जिंकणाऱया मुलाने याच विषयावर बोलत गोडसेला आदर्श नायक ठरविले होते. आता यावरून गेंधळ निर्माण झाला असून कारवाईची मागणी केली जात आहे.
इयत्ता 5 वी ते 8 वीपर्यंतच्या मुलांसाठी या विषयांची निवड स्थानिकस्तरावर शासकीय अधिकाऱयांनीच केली होती. गोंधळ झाल्यावर आता वलसाडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी मीताबेन गवळी यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशीनंतर जबाबदार व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटले आहे. ही स्पर्धा बालप्रज्ञाशोध कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
15 नोव्हेंबर रोजी जामनगरमध्ये नथुराम गोडसेचा पुतळा बसविण्यावरून वाद झाला होता. जामनगरमध्ये हिंदू सेनेकडून हनुमान आश्रमात गोडसेचा पुतळा बसविण्यात आला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी तेथे पोहोचून हा पुतळा फोडला होता. याप्रकरणी हिंदू सेनेने काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती.