प्रतिनिधी /फोंडा
लेखक व चित्रपट निर्माते मिलिंद म्हाडगूत यांनी लिहिलेल्या ‘शोध सुखाचो’ या कोकणी नाटय़पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच फोंडा येथील थ्रिफ्ट सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकारी प्रकाश नाईक तर प्रमुख वक्त्या म्हणून अभिनेत्री अमिता नायक सलत्री, खास निमंत्रित म्हणून रंगकर्मी नामदेव शेट, साळू भगत, एकदंत क्रिएशन्सचे अध्यक्ष महादेव खानोलकर व लेखक मिलिंद म्हाडगूत हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मिलिंद म्हाडगूत हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असून साहित्य निर्मितीबरोबरच चित्रपट, रंगभूमी, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे, असे अमिता सलत्री यावेळी बोलताना म्हणाल्या. शोध सुखाचो या चित्रपटातील आपले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. मिलिंद म्हाडगूत यांचे नाटय़ व चित्रपट क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रकाश नाईक यांनी सांगितले. नामदेव शेट यांनी त्यांच्या या नवीन नाटकाचा आढावा घेतला. साळू भगत यांनीही यावेळी विचार मांडले. आपले मनोगत व्यक्त करताना म्हाडगूत म्हणाले एखाद्या सिनेमाचे नाटय़रुपांतर करणे हे लेखकासाठी आव्हान असते. आपण आत्तापर्यंत सिनेमासाठी लिहिलेल्या पटकथांचे नाटय़रुपांतर करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. स्वागत व प्रास्ताविक महादेव खानोलकर यांनी केले. प्रकाश नाईक व अन्य मान्यवरांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप फडते यांनी तर प्राजक्ता म्हाडगूत यांनी आभार मानले.