अनेक संघटनांचा सहभाग तर काहींनी दिला संपाला पाठिंबा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जुनी पेन्शन, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता फरक यासह विविध मागण्यांसाठी शासकीय-निमशासकीय कर्मचाऱयांच्या समन्वय समितीने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे चित्र होते. सहभागी कर्मचारी संघटनांनी ठिकठिकाणी शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. अनेक संघटनानी या संपात सहभागी न होता केवळ पाठिंबा दर्शवलेला दिसला. मात्र दुपारी हा संप राज्यस्तरावरून मागे घेण्यात आल्याने संपातील कर्मचाऱयांना कामावर हजर होण्याचे निर्देश प्राप्त झाले होते.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाची 23 व 24 फेब्रुवारीपर्यंत हाक देण्यात आली होती. या लाक्षणिक संपाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत सर्व कर्मचारी संघटनांसोबत गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत कर्मचाऱयांना सहभागाचे आवाहन जिल्हा समन्वय समितीने केले होते. यासाठी सर्वांनी एकजुटीने हा संप यशस्वी करण्याचा निर्धार कर्मचाऱयांच्या जिल्हा समन्सवय समितीने केला होता. त्यानुसार बुधवारी या संपाच्या पहिल्या दिवशी रत्नागिरीत अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचारी संघटनांनी सहभाग दर्शवला होता.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, कृषी विभाग, जिह्यातील सर्व पचांयत समित्यांसह नगर पालिका, नगर परिषद आदी कार्यालयातील कर्मचारीही संपात उतरले होते. शिक्षक संघटनांचाही पाठिंबा होता. या कर्मचाऱयांच्या राज्यव्यापी संपामुळे विविध कार्यालयात प्रमुख अधिकारी, काही मोजकेच कर्मचारी वगळता कार्यालयात शुकशुकाट होता. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावरही या दिवशी परिणाम झाला होता. कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी वर्दळही या दिवशी अत्यल्प होती. या संपात येथील महसूल कर्मचारी संघटना, कृषी कर्मचारी संघटना, सहकार विभाग, ग्रामसेवक संघटना, जि. प. कर्मचारी महासंघ, मलेरिया कर्मचारी संघटना, आयटीआय कर्मचारी संघटना आदी विविध संघटनांचा सहभाग होता. जिल्हा परिषद महासंघासह प्रमुख संघटनांही या संपात सहभागी झालेल्या होत्या. जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. लेखा संघटनेसह कास्ट्राईब, शाखा अभियंता, लिपिकची एक संघटना यामध्ये सहभागी झालेल्या नव्हत्या.
बुधवारी सकाळपासून या राज्यव्यापी संपात कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद भवन आवारात जि.प. कर्मचारी महासंघ, शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयाच्या आवारात तेथील कर्मचारी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. जिल्हा महसूल कर्मचाऱयांनी केलेल्या निदर्शनात बहुसंख्येने कर्मचारी तर जिल्हा परिषदेतील सुमारे साडेतीनशेहून अनेक कर्मचारी सहभागी होते. पण दुपारी 12.30 च्या सुमारास संप स्थगित झाल्याचा संदेश राज्य संघटनांकडून प्राप्त होताच संपात उतरलेले सर्व कर्मचारी दुपारी दीड वाजल्यानंतर कार्यालयात हजर झाले होते. राज्य सरकारने जुन्या पेन्शन इतर सर्व मागण्यांबाबत दिलेला शब्द पाळला नाही तर समन्वय समिती मे महिन्यापासून बेमुदत संपावर जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रत्नागिरीत संपाचे पडसाद
@संपाची माहिती असल्याने नागरिकांची कामांसाठी जिल्हाधिकारी, जि. प., पं. स. कार्यालयांकडे पाठ.
@अनेक नागरिक, ठेकेदारांनी सकाळी कार्यालयात फेरी मारली असता खुर्च्या खाली असल्याने माघारी परतले.
@कंत्राटी कर्मचाऱयांनी संपात सहभाग न घेता कार्यालयात उपस्थित राहणे पसंत केले.
@काही सेवानिवृत्तीवर आलेल्या कर्मचाऱयांनी आंदोलनात उतरण्यास नकार दिला.
@बहुसंख्य शासकीय कर्मचारी संपात असल्यामुळे कामकाज झाले होते ठप्प.
शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱयांची संपाद्वारे निदर्शने
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरीतील सर्व वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱयांनी राज्यव्यापी संपात शंभर टक्के सहभाग घेऊन बुधवारी जोरदार निदर्शने केली. शासन स्तरावर विविध मागण्यांसंदर्भात हा संप पुकारण्यात आला होता. यावेळी स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष सागर सुर्वे, सचिव प्रवीण मोहिते, कोषाध्यक्ष चंद्रकांत चौगुले, राज्य तंत्र शिक्षण विभागीय कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अवधूत देवकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोहिते व कर्मचारी उपस्थित होते.