कडी कापून सहा ओंडके पळविल्याने खळबळ ः सुमारे दीड लाख रुपयाचे चंदन लंपास
प्रतिनिधी/ बेळगाव
वनखात्याच्या कार्यालय आवारातील एका खोलीतून चंदनाचे ओंडके चोरण्यात आले आहेत. शनिवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून खोलीच्या कुलुपाची कडी कापून चंदन चोरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मध्यवर्ती बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर व मार्केट पोलीस स्थानकाजवळच वनखात्याचे कार्यालय आहे. तीन जिल्हय़ात जप्त करण्यात आलेले चंदन डीआरएफओ कार्यालयाशेजारील खोलीत ठेवून त्याला बाहेरून कुलूप लावण्यात आला होता. खोलीला लावलेला कुलूप तसाच आहे. तरी आतील चंदनाचे सहा ओंडके चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खोलीला लावलेली कडी तशीच असताना चोरी कशी झाली? असा प्रश्न तपास अधिकारी व वनखात्याच्या अधिकाऱयांना पडला होता. मात्र कडी कापून चोरटय़ांनी खोलीत प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
एकाचवेळी ही चोरी झाली नाही. वारंवार खोलीत प्रवेश करता यावा यासाठी कडी कापण्यात आली आहे. त्यावर कुलूप लावले की कापलेला भाग दिसतही नाही. मात्र सहजपणे कुलूप अलगद काढून खोलीत प्रवेश करता येतो. बाहेर पडल्यानंतर पुन्हा आहे तसा कुलूप लावता येतो. हा प्रकार वेळेत लक्षात आला नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या चंदनाच्या लाकडांची चोरी झाली आहे. मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. वारंवार चंदनाची लाकडे पळविण्यात आल्याचे उघडकीस आल्याने चोरटे माहितगार असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.