बसस्थानकाचे 90 टक्के काम पूर्ण : उर्वरित कामाला गती
प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात सुसज्ज आधुनिक बसस्थानकाची निर्मिती होत आहे. या बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे येत आहे. त्यामुळे इतर कामे हाती घेतली जात आहेत. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीबरोबर प्रवेशद्वाराचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच बसस्थानकाचे प्रवेशद्वार पाहायला मिळणार आहे.
स्मार्ट बसस्थानकाच्या कामामुळे बसस्थानकात तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. दरम्यान, जुने प्रवेशद्वार बंद करून जुन्या भाजी मार्केटच्या रोडवर प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे. या प्रवेशद्वारातूनच सध्या बस वाहतूक सुरू आहे. मात्र, आता बसस्थानकाच्या कामाबरोबर प्रवेशद्वारही उभारले जात आहे. बसस्थानकात प्रवेश करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी अधिक रुंदीचे प्रवेशद्वार केले जाणार आहे. याकरिता शनिवारी खोदाईचे काम हाती घेण्यात आले.
तब्बल 30 कोटींच्या निधीतून बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. यामध्ये बसस्थानक, पार्किंग, बसफलाट, शौचालय, प्रवेशद्वार आदी उभारले जाणार आहेत. आतापर्यंत बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पार्किंग, बसफलाट, प्रवेशद्वाराचे काम शिल्लक आहे.
दोन महिन्यात संपूर्ण बसस्थानकाचे काम पूर्ण
येत्या दोन महिन्यात संपूर्ण बसस्थानकाचे काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीच्या कामालाही वेग आला आहे. त्याबरोबर प्रवेशद्वारचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानकाचा लूक लवकरच बदललेला दिसणार आहे.