नगरसेवकांकडून शहापूर, वडगाव परिसरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
चोवीसतास पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहर आणि उपनगरात जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे रस्त्याचे नुकसान झाल्याने खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शहापूर, वडगाव परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती एलऍण्डटी कंपनीकडून करण्यात आली. यावेळी या कामाची पाहणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली.
शहापूर, वडगाव, खासबाग अशा विविध परिसरात चोवीसतास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने रस्ते खराब झाले आहेत. चरीमुळे वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. जलवाहिन्या घातल्यानंतर रस्ते दुरुस्त करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे. त्यामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम एलऍण्डटी कंपनीकडून करण्यात येत आहे.
दुरुस्ती केल्याने समाधान
सध्या खासबाग, वडगाव, शहापूर, कोरे गल्ली अशा विविध भागातील चरी बुजविण्याचे काम हाती घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यावेळी रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करण्याची सूचना नगरसेवक रवी साळुंखे यांनी अधिकाऱयांना केली. जलवाहिन्या घालण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.