धडे-सावर्डे येथील प्रकार
प्रतिनिधी /कुडचडे
धडे-सावर्डे येथील सौ. मनीषा मंगलदास नाईक (वय 53) हिचा काल सोमवार दि. 28 मार्च 2021 रोजी सकाळी अंदाजे 10.30 वा. तिचा दत्तक घेतलेला मुलगा प्रथमेश नाईक व त्याची प्रियसी मिळून दोघांनी तिचा राहत्या घरी खून केल्याची माहिती कुडचडे पोलिस स्थानकातून प्राप्त झाली आहे.
अधिक माहिती नुसार सदर घटना सकाळी अंदाजे 10.30 वा. झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुपारी मनीषा यांचे पती जेवणासाठी घरी आले असता मनीषा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजाऱयांना बोलावून आणले. त्यांनी दरवाजा मोडून घरात प्रवेश केला असता मनीषा रक्ताच्या थारोळय़ात मृत स्थितीत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन तपास सुरु केला व जी माहिती मिळाली त्या अधारे दत्तक मुलगा प्रथमेश व तिच्या प्रियसीला कलम 302 याच्या खाली अटक करण्यात आले आहे.
दत्तक मुलगा प्रथमेश व त्याची प्रियसी मिळून दोघांनी लोखंडी सळीने मनीषा हिच्या डोक्यावर प्रहार केले. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. या खून प्रकरणाचा तपास कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत हे करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.
घरातून लग्नाला विरोध
दत्तक मुलगा प्रथमेश याचे व एका मुली बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते व त्याची माहिती आई मनीषा हिला व वडील मंगलदास नाईक यांना मिळाली होती. त्यानंतर त्या दोघांनी सदरच्या लग्नाला विरोध दर्शविला होता. या रागाने दोघांनी एकत्र येऊन व मनीषा हिला घरात एकटी असल्याची संधी साधून सदर खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.