ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने सुरू आहेत. शनिवारी येथे गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटलचा सामना सुरू असताना पिंपरीतील काही जणांनी या सामन्यावर सट्टा लावला होता. गुंडा विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून, तीन सट्टा बुकींना अटक केली. त्यांच्याकडून 27 लाखांच्या रोकडसह 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सनी उर्फ भुपेंद्र चरणसिंग गिल, रिक्की राजेश खेमचंद, सुभाष रामकीसन अगरवाल अशी अटक केलेल्या तीन सट्टा बुकींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिकारी हजरतअली पठाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरू असलेल्या गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर पिंपरी येथील वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, हरीश माने आणि त्यांच्या पथकाने वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 27 लाख रुपये रोख आणि आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.