प्रतिनिधी/ सातारा
शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात होत असलेल्या 64 व्या कुस्ती स्पर्धेकरता राज्यभरातून सुमारे 55 हजाराहून अधिक कुस्तीप्रेमी येणार असल्याने स्पर्धेच्या ठिकाणाची स्वच्छता करणे महत्वाची बाब आहे. त्याची जबाबदारी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने याकरता नियोजन केले असून 15 कर्मचाऱयांची तीन पथके तयार केली आहेत. ती 24 तास कार्यरत राहणार आहेत. तसेच 125 सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धेच्या परिसरात पडणारा कचरा उचलून तो लगेच घंटागाडीतून सोनगाव कचरा डेपोत कसा पोहचवता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे.
सातारा शहरात तब्बल 59 वर्षानंतर होत असलेल्या 64 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेकरता राज्यभरातून 55 हजाराहून अधिक कुस्तीप्रेमी येणार असल्याने एकाच ठिकाणी एवढय़ा मोठय़ा संख्येने लोक जमा होणार असल्याने त्यामुळे क्रीडा संकुल परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आपोआपच आलेली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आरोग्य विभागास सुचना देताच आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड यांच्यासह आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, प्रशांत गंजीवाले यांनी आठ दिवसांचा शाहु क्रीडा संकुल परिसराचा व जेथे मल्ल राहणार आहेत त्या ठिकाणच्या स्वच्छतेचे नियोजन केले आहे. त्याकरता त्यांनी शाहु क्रीडा संकुलामध्ये 125 सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. तसेच कसलाही कचरा आढळून येवू नये याकरता 15 कर्मचाऱयांची एक टीम तीन शिपमध्ये काम पहाणार आहे. तेथे तयार होणारा कचरा लगेच गोळा करुन घंटागाडीतून सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येणार आहे. दरम्यान जेथे मल्ल राहणार आहेत त्या ठिकाणच्या स्वच्छतेकरता स्वतंत्र दोन आरोग्य कर्मचाऱयांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.