पेट्रोल-डिझेलच्या दरात 14 व्यांदा वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या 16 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14 व्यांदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 105.41 आणि डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर झाले आहे. गेल्या पंधरवडय़ात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 9.96 रुपयांनी वाढ झाली आहे.
देशात जानेवारी महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तसेच 10 मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास प्रारंभ झाला होता. त्यानंतर किरकोळ एक-दोन दिवस वगळता दररोज इंधनदरात वाढ झालेली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलने 105 रुपयांचा टप्पा ओलांडला असून मुंबईत 120 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहे. मुंबईत डिझेल दरात 85 पैशांची वाढ झाली असून हा दर 104.77 रुपयांवर पोहोचला आहे.