इनरव्हीलतर्फे प्रभा बिशीरोट्टी यांच्याकडे ऑटोची चावी सुपूर्द : महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे शुक्रवारी सकाळी आरटीओ कार्यालयाच्या आवारात प्रभा बिशीरोट्टी या महिलेकडे पिंक ऑटोची चावी सुपूर्द करण्यात आली. इनरव्हील क्लबने पिंक फर्स्ट या आपल्या उपक्रमांतर्गत महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला.
आरटीओ शिवानंद मगदूम, इनरव्हीलच्या डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन रत्ना बेहरे, इनरव्हील बेळगावच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, सचिव डॉ. सविता कद्दु आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत प्रभा यांच्याकडे ऑटोची किल्ली देण्यात आली. शिवानंद यांनी हिरवा झेंडा उंचावून रिक्षा सुरू करण्यास मान्यता दर्शविली. यानंतर प्रभा यांनी रत्ना बेहरे व सुषमा शेट्टी यांना घेऊन एक फेरी मारली.
या उपक्रमासाठी कॅनरा बँकेने कर्ज देऊ केले असून बँकेतर्फे विभागीय सरव्यवस्थापक कृष्णप्पा, विभागीय व्यवस्थापक राजशेखर, ज्ये÷ व्यवस्थापक अमित उपस्थित होते. कॅनरा बँक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी प्रोत्साहन देत असून विविध उपक्रमांसाठी कर्ज देत आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णप्पा यांनी केले.
सदर ऑटो हायटेक मोटर्सने विशेषरित्या तयार केली असून तिचा रंग गुलाबी आहे. ‘टू वूमन फॉर वूमन’ असे त्यावर नमूद करण्यात आले आहे. उत्तम प्रकारच्या बांधणीमुळे ही ऑटो टिकावू आहे, असे हायटेक मोटर्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र देसाई यांनी सांगितले. यावेळी शोभा कुलकर्णी यांनी प्रभा यांच्याकडे दोन हप्त्यांची रक्कम दिली. तसेच क्लबतर्फे प्रभा यांना गुलाबी पोषाख आणि खाकी जॅकेट देण्यात आले. सुषमा शेट्टी यांनी स्वागत केले.
उपक्रम अत्यंत स्तुत्य
शिवानंद मगदूम यांनी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अधिक प्रमाणात महिला चालक तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि आरटीओतर्फे आपणही दोन हप्ते भरत असल्याचे जाहीर केले.
– आरटीओ शिवानंद मगदूम