आजही जोरदार पावसाची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
अवकाळी पावसाचा प्रभाव आणखी दोन दिवस रहाणार असून रविवारी रामनवमीच्या दिवशी सायंकाळी उशिरा व काही ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळी विजांच्या गडगडाटासह गोव्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. वाळपई व मडगाव येथे मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळीवाऱयाने बरीच हानी झाली. मडगावात सुमारे 2 से. मी. एवढा जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
राज्यात आज दि. 12 रोजी सर्वत्र मध्यम तथा जोरदार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली असून त्यासाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्याने रविवारी सायंकाळी राज्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्यातील अनेक भागात वीजांचा लखलखाट व मेघगर्जना सुरू झाल्या. काही भागात 5 ते 10 मिनिटांपर्यंत पाऊस पडला तर वाळपई आणि मडगावात मात्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
काल सोमवारी तापमानात आणखी दोन डि. से. ने वाढ झाली. रात्री अनेक भागात पर्जन्यवृष्टी झाली तर आज राज्यात सर्वत्र मध्यम तथा जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.