अभिनेत्री दीपिका पदूकोन स्वतःचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’च्या चित्रिकरणासाठी हैदराबादमध्ये पोहोचली आहे. दीपिका सध्या रामोजी फिल्मसिटीत उभारण्यात आलेल्या एका विशाल सेटवर चित्रिकरण करत असल्याचे समजते.
या चित्रपटातून अभिनेत्री विज्ञानकथा धाटणीच्या चित्रपटांमध्ये एंट्री करत आहे. प्रोजेक्ट के हा आतापर्यंतच्या सर्वात महागडय़ा चित्रपटांपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे. नागा अश्विन यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया या चित्रपटात तेलगू सुपरस्टार प्रभास, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दीपिका पदूकोन मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील. तर चित्रपटातील अन्य कलाकारांसंबंधी अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही. दीपिकाला अलिकडेच टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
दीपिका पुढील काळात बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याचबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम देखील भूमिका साकारतोय. पठाणसह अभिनेत्री प्रोजेक्ट के, द इंटर्न, फायटर या चित्रपटांमधून झळकणार आहे.