वऱहाडी मंडळींना बसला आश्चर्याचा धक्का
विवाहसोहळय़ात वधूवराला सोने-चांदी तसेच अन्य महागडय़ा भेटवस्तू दिल्या जातात. पण तामिळनाडूतील एका विवाहसोहळय़ात वराच्या मित्रमंडळींनी दिलेली भेटवस्तू चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या देशभरात याच वस्तूची चर्चा सुरू आहे. तामिळनाडूच्या चेयुर येथे पार पडलेल्या या विवाहसोहळय़ातील अनोख्या भेटवस्तूने सोशल मीडियावर चर्चेचा विषय होण्याचा मान मिळविला आहे.
मित्रांकडून वर ग्रेस कुमार आणि वधू कीर्तना यांना एक लिटर पेट्रोल आणि एक लिटर डिझेल देण्यात आले. ही भेटवस्तू पाहून प्रारंभी नवविवाहित दांपत्य आश्चर्यचकित झाले, परंतु काही क्षणांनी त्यांनी मित्रांची ही भेट आनंदाने स्वीकारली आणि छायाचित्रासाठी पोझही दिली. या प्रकारानंतर विवाहसोहळय़ात एकच हशा पिकला.
2018 मध्ये तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. कुड्डालोरमधील एका विवाहसोहळय़ात काही मित्रांनी वराला 5 लिटर पेट्रोलने भरलेला कॅन दिला होता. मागील काही काळापासून देशात इंधनाचे दर वाढत आहेत.