हार्दिक पंडय़ा-संजू सॅमसनचे संघ आमनेसामने
नवी मुंबई / वृत्तसंस्था
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स व संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ आज (गुरुवार दि. 14) आयपीएल साखळी सामन्यात आमनेसामने भिडत असून दोन्ही संघांची गोलंदाजी भरभक्कम असल्याने उभय संघात जोरदार चुरस अपेक्षित आहे. गुजरात व राजस्थान संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 3 विजय व 1 पराभव अशी समसमान कामगिरी नोंदवली आहे. येथील लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
जलद-मध्यम आणि फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर राजस्थान रॉयल्सची कामगिरी उत्तम होत आली असून अनुभवी ट्रेंट बोल्ट नव्या चेंडूवर आणि त्याच प्रमाणे स्लॉग ओव्हर्समध्ये भेदक मारा करत असल्याने राजस्थानला वर्चस्व गाजवणे सहजसेपे होत राहिले आहे. यापूर्वी लखनौविरुद्ध लढतीत त्याने पहिल्याच षटकात केएल राहुल व कृष्णप्पा गौतम यांना बाद करत खळबळ उडवून दिली होती.
प्रसिद्ध कृष्णाने देखील तोडीस तोड तेजतर्रार मारा केला असून भारतीय क्रिकेटमध्ये आपण ‘नेक्स्ट-बॉलिंग सेन्सेशन’ ठरु शकतो, याची चुणूक दिली आहे. नवोदित कुलदीप सेनने देखील लखनौविरुद्ध पदार्पणात शेवटच्या षटकात 15 धावांचे यशस्वी संरक्षण करुन दाखवले आहे.
या संघाची फिरकी गोलंदाजीची भिस्त वरिष्ठ अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांच्यावर असेल. सध्याच्या घडीला चहलच्या खात्यावर या हंगामातील सर्वाधिक बळी असून त्याने 6.50 च्या इकॉनॉमीने 11 बळी घेतले आहेत. त्या तुलनेत अश्विनला इतके ब्रेकथ्रू मिळवता आले नसले तरी त्याने 6.87 च्या इकॉनॉमीने प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे, त्याची 4 षटकेही महत्त्वाची ठरु शकतात.
संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार-यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेतमेयर, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, रियान पराग, नॅथन काऊल्टर नाईल, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी, करुण नायर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, जेम्स नीशम, अनुनय सिंग, डॅरेल मिशेल, ध्रुव जुरेल, शुभम गरवाल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, ओबेड मकॉय, तेजस बरोका, केसी करिअप्पा.
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाळ.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
युवा सलामीवीर शुभमन गिलवर गुजरात टायटन्सची भिस्त
आयपीएलमधील यंदाचे पदार्पणवीर गुजरात टायटन्स फलंदाजीत युवा सलामीवीर शुभमन गिलवर सर्वाधिक अवलंबून आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कर्णधार हार्दिक पंडय़ा चौफेर फटकेबाजी करु शकतो. मात्र, अलीकडे त्याचा भर आपली इनिंग अधिक डीप नेण्यावर रहात आला आहे.
मॅथ्यू वेडला धावा जमवण्यात झगडावे लागत असून डेव्हिड मिलरने देखील अद्याप लक्षवेधी फटकेबाजी सुरु केलेली नाही. यामुळे, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन यांच्यावर अधिक जबाबदारी येत आहे. राहुल तेवातिया उत्तुंग षटकार फटकावत फिनिशरची भूमिका पार पाडण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आला आहे.
जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, अनुभवी स्पीडस्टार मोहम्मद शमी आणि हार्दिक पंडय़ा हे गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणण्याची क्षमता राखून आहेत. फिरकीपटू रशिद खान सर्वात किफायतशीर मारा करत आला असून प्रतिस्पर्धी फलंदाज त्याच्या 4 षटकात आक्रमण करण्याऐवजी ती सावधपणे खेळून काढण्यावर भर देत आहेत. अर्थात, टायटन्सच्या गोलंदाजांना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मागील लढतीत शार्पनेस दाखवता आला नव्हता, ही बाबही लक्षवेधी आहे. साहजिकच, जोस बटलर, शिमरॉन हेतमेयर, सॅमसन व देवदत्त पडिक्कलसारख्या अव्वल दर्जाच्या फलंदाजांना सामोरे जाताना टायटन्सची गोलंदाजी कशी होईल, याची उत्सुकता असेल.