प्रतिनिधी /शिरोडा
सम्राट क्लब शिरोडातर्फे मास्टर दत्ताराम वळवईकर नाटय़ महोत्सवाअंतर्गत शुक्रवार 22 एप्रिल रोजी ‘व्यंकोजी वाघ’ हा ऐतिहासिक नाटय़प्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाटी शिरोडा येथील ओंकार गणेशोत्सव मंडळाच्या रंगमंचावर हा नाटय़प्रयोग सादर होणार आहे.
क्लबच्या वार्षिक उपक्रमाचा एक भाग म्हणून 1 मे रोजी ‘सम्राट सहल’ आयोजित करण्यात आली आहे. क्लबच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. क्लबचे पदाधिकारी सूरज नाईक यांची सम्राट इंटरनॅशनलच्या राज्य संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. लेखक महेश पारकर यांच्या कथेला राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल तर करिष्मा पुंडलीक पारकर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्याने गौरविण्यात आले. क्लबचे उपाध्यक्ष आग्नेलो फर्नांडिस यांनी स्वागत तर सचिव रवी नाईक यांनी आभार मानले.