विद्यमान अध्यक्ष मॅक्रॉन आणि अतिउजवे मरिन यांच्यात चुरशीची स्पर्धा
पॅरीस / वृत्तसंस्था
फ्रान्स देशाच्या अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या दुसऱया टप्प्याच्या मतदानाला प्रारंभ झाला आहे. विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अतिउजव्या विचारसरणीचे नेते मरिन ले पेन यांच्यात चुरशीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. आज सोमवारी मतगणना होणार असून कौलही हाती येणार आहे.
फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात सर्व पक्षांचे किंवा अपक्ष उमेदवार स्पर्धेत असतात. या टप्प्यातील मतगणनेत जे उमेदवार प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर असतात त्यांच्यात दुसरी आणि अंतिम स्पर्धा होते. 2017 मध्ये मॅक्रॉन आणि मरिन यांच्यातही स्पर्धा झाली होती आणि मॅक्रॉन विजयी झाले होते. यंदाही अंतिम फेरीत हेच दोन उमेदवार पोहचले आहेत.
मॅक्रॉन यांचे पारडे जड
आज सोमवारी पहाटे मतदानोत्तर सर्वेक्षणाचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष मतगणनेचे परिणाम मात्र सोमवारी रात्री उशीरा किंवा मंगळवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे. मरिन यांनी अध्यक्ष बनल्यास हिजाबवर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. मात्र, मॅक्रॉन यांनी या घोषणेला विरोध केला. फ्रान्स हा पश्चिम युरोपातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारा देश आहे. येथे मुस्लीम मतदारांची संख्या 8 टक्के असल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत मॅक्रॉन विजयी झाल्यास ते सलग दुसऱयांना अध्यक्ष बनणारे दुसरे राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते. मात्र मरिनही यावेळी अधिक तयारीने स्पर्धेत उतरल्याचेही तज्ञांचे मत आहे. मतदान किती टक्के होते यावरही बरेच काही अवलंबून राहील, असे फ्रान्समधील काही तज्ञांनी प्रतिपादन केले आहे.