कुर्डुवाडी/प्रतिनिधी
मेव्हण्याचे लग्न जमवायला गेलेल्या वकिलाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाट व दिवाण उचकटून २ लाख ७६ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रकमेवर आपला हात साफ केला. ही घटना बारलोणी ता.माढा येथे दि.२८ रोजीनं दु.२.३० ते ५ वा. दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी नितीन गायकवाड हे आपल्या मेव्हण्याचे लग्न जमवण्यासाठी सांगवी जि. उस्मानाबाद येथे गेले होते. दरम्यान दि.२८ रोजी दुपारी २.३० ते ५ वा दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाट व दिवाण उचकटून १ लाख ४० हजार रूपयांचे ४ तोळ्याचे सोन्याचे गंठण,३५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी,१७ हजार ५०० रूपयांचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे, ७ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टाॅप्स,७ हजार रुपये किंमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ७० हजार रु रोख असा एकूण २ लाख ७६ हजार ५०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. सध्या ग्रामीण भागात चोरीचे सत्र वाढले असून ही घटना भर दुपारी घडल्यामुळे नागरिकांत घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून गस्त वाढवण्याबाबत नागरिकांतून मागणी होत आहे.