कुर्डुवाडी/प्रतिनिधी
मुलाच्या जन्मापूर्वीच त्याला कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून पशुधन पर्यवेक्षक वैभव बापूसाहेब अनंतकवळस रा. कुर्डू ता. माढा यांनी इच्छितस्थळी बदलीसाठी त्या प्रमाणपत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केली आहे.याबाबत मंगल उत्तरेश्वर सातव यांच्या फिर्यादीवरुन वैभव बापूसाहेब अनंतकवळस ,तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन रेवप्पा पट्टणशेट्टी, व तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रुपचंद मेहता यांच्यावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वैभव बापुसाहेब अनंतकवळस रा. कुर्डू माढा हे पशुधन पर्यवेक्षक म्हणून नोकरीस आहेत. २०११ मध्ये कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या वैदयकीय प्रमाणपत्र शिबिरावेळी वैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन रेवप्पा पट्टणशेट्टी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मेहता कार्यरत होते. त्यांच्याकडून २२ जुलै २०११ रोजी वैभव बापुसाहेब अनंतकवळस यांना श्रेयश नावाचा मुलगा झालेला नसताना त्या शिबीरामध्ये श्रेयश वैभव अनंतकवळस नावाने ७० टक्के अपंगत्वाचा वैदयकीय दाखला वैदयकीय अधिक्षक व सिव्हिल सर्जन यांनी दिला होता. यानंतर ४ मार्च २०१४ रोजी श्रेयश नावाचा मुलगा झाला तो मतिमंद नसुन प्रगती पब्लिक स्कुल, कुर्डू ता. माढा येथे शिक्षण घेत आहे.
१५ मे २०१४ रोजी वैभव अंतकवळस यांनी बदलीचे परिपत्रकाचा फायदा घेण्यासाठी मुलाच्या अपंगत्वाच्या वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन ७ जून २०१९ रोजी कोळगाव ता.करमाळा येथून वाकाव ता. माढा येथे इच्छित स्थळी बदली करून घेतली.
या बोगस प्रमाणपत्राची माहिती मिळाल्यानंतर मंगल सातव यांनी वैभव अंतकवळस ,डॉ. अशोक मेहता व मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांच्या विरुद्ध रीतसर तक्रार दिली होती. याबाबत सातव यांनी कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्यानुसार न्या.सय्यद यांच्या आदेशावरुन भादवि १५६(३) अन्वये कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पो.ना बागडे हे करीत आहेत