पंतप्रधान मोदींचे डेन्मार्कमध्ये प्रतिपादन, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा
कोपेनहेगन / वृत्तसंस्था
भारतात सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे. सर्व प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे जो भारतात गुंतवणूक करणार नाही, त्याने मोठी संधी गमावल्यासारखे होईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कमध्ये केले. ते येथील उद्योजकांसमोर बोलत होते. भारतीय समुदायालाही त्यांनी संबोधित केले. जर्मनीतून ते मंगळवारी डेन्मार्कमध्ये पोहचले.
त्यांचे या देशात जोरदार स्वागत करण्यात आले डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे प्रेडरिकसन यांनी स्वतः त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्या पंतप्रधान मोदींना घेऊन स्वतः निवासस्थानी आल्या. तेथे दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. हरित धोरणात्मक भागीदारीसंबंधी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्येही चर्चा झाली. नंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी युक्रेन युद्ध त्वरित थांबवावे असे आवाहन केले.
विविध विषयांवर चर्चा
दोन्ही नेत्यांनी कौशल्य विकास, पर्यावरण संरक्षण, पुनउ&पयोगी ऊर्जा, पी2पी संबंध, आर्कटिक क्षेत्र आदी विषयांवर सविस्तर चर्चा करुन धोरण निर्धारित केले. ही चर्चा आणि शिष्टमंडळ चर्चा फलद्रूप झाल्याचे नंतर भारताच्या विदेश व्यवहार विभागाने स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींसाठी येथील भारतीय समुदायाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला.
विविध विषयांचा उहापोह
भारतीय समुदायासमोर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विविध विषयांचा उहापोह केला. विशेषतः पर्यावरण संरक्षणावर त्यांनी भर दिला. पृथ्वीचा नाश करण्यात भारताने कधीही योगदान दिलेले नाही. भारत हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हरित भविष्य या संकल्पनेत डेन्मार्क आमचा भागीदार आहे. डेन्मार्क मधील भारतीयांनी येथील जनतेला भारताचे महत्व पटवून द्यावे. तसेच भारतात गुंतवणूक केल्यास ती लाभदायक ठरेल याची जाणीव करुन द्यावी. यूज अँड थ्रो ही नीती पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे. प्रत्येक वर्षी आपण 5 बिगर भारतीय मित्रांना भारतात प्रवासासाठी आणा. त्यातून त्यांना भारताची माहिती होईल. भारतात सध्या आश्वासने पूर्ण करणारे सरकार आहे. याचा लाभ आवश्य बिगर भारतीयांनी घ्यावा. भारतातील गुंतवणूक वाया जाणार नाही हे निश्चित आहे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
‘फोमो’ शब्द गुंतवणुकीसाठीही…
फोमो हा शब्द सध्या सोशल मिडियावर बराच प्रचलित आहे. फोमो याचा अर्थ फियर ऑफ मिसिंग आऊट, अर्थात संधी गमावण्याची चिंता असा आहे. हा शब्द सामान्यतः विकेंड पार्टीसंबंधी उपयोगात आणला जातो. तथापि, भारताच्या संदर्भात बोलायचे, तर तो गुंतवणुकीसंदर्भातही उपयोगी पडेल. भारतात गुंतवणूक करा अन्यथा मोठी संधी गमावाल असा संदेश त्यांनी या शब्दाचा संदर्भ घेऊन दिला. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनीही याला संमती दर्शविल्याचे सांगण्यात आले.