पंचायतीकडून मासळी विक्रेत्यांना नोटीस जारी
वार्ताहर /माशेल
माशेल येथील मासळी विक्रेत्यांना कदंब बसस्थानकावरील मार्केटमध्ये स्थलांतर करण्यासंबंधी नोटीस जारी करण्यात आली आहे. येत्या 12 मे रोजी हे स्थलांतर होणार असून तिवरे – वरगांव पंचायतीने जारी केलेल्या नोटीसीत तसे नमूद केले आहे.
माशेल बाजारातील फळ, फुले, भाजी तसेच अन्य विक्रेत्यांनी यापूर्वीच नवीन मार्केट म्हणून स्थलांतर करुन आपापल्या जागा जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र मासळी विक्रेत्यांकडून विविध कारणे पुढे करीत स्थलांतरासाठी चालढकल केली जात होती. गुरांचा उपद्रव रोखण्यासाठी गेटची व्यवस्था, मार्केट शेडच्या बाहेर पत्रे या सर्व अटी मान्य करुन पंचायतीतर्फे मासळी विपेते संघटनेचे अध्यक्ष उमेश भोसले व इतर मासळी विकेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थलांतराची तारीख निश्चित करुन मासे विक्रेत्यांना नोटीस जारी केल्याचे सरपंच उन्नती नाईक यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच सिद्धार्थ गाड, जयेश नाईक, संकेत आमोणकर, फ्रान्सिस लोबो, संज्योत खडपकर उपस्थित होते.
मासळी मार्केट मुख्य रस्त्याला लागून असल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करुन मासळी विकत घेत असल्याने, वाहतुकीचा खोळंबा होत असे. वाहतूक पोलिसांनाही न जुमानता रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात होती. त्यामुळे हे मासळी मार्केट तेथून दुसऱया जागी हलविण्याची मागणी वारंवार केली जात होती. मासळी मार्केटमधील सांडपाणी जवळच्या ओहोळात सोडले जात असल्याने दुर्गंधी व आरोग्याची समस्या निर्माण झाली होती. मासळी मार्केटचे स्थलांतर झाल्यानंतर या सर्व समस्या सुटतील असे सरपंच उन्नती नाईक यांनी सांगितले.