शाहू स्मृती शताब्दी समितीतर्फे शाहूंच्या विचाराचा जागर
कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी शाहू विचार जागर यात्रा बुधवारी साताऱयात दाखल झाली. सातारकरांनी यात्रेचे स्वागत केले. दरम्यान, ज्येष्ठ विचारवंत, तत्वज्ञ डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या घरी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देवून विचार जागर यात्रेचा हेतू विषद केला.
विचार जागर यात्रेला मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकातून प्रारंभ झाला होता. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी विचार जागर यात्रेला शुभेच्छा देवून सुरूवात केली होती. मंगळवारी सायंकाळी ही यात्रा कराडमध्ये पोहचली. बुधवारी सकाळी कराडमधून यात्रा साताऱ्यात दाखल झाली. यावेळी साताऱयातील नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेतील रथावर लावलेले शाहूंच्या विचाराचे फलक लक्षवेधी ठरले.
डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या निवासस्थानी भेट
विचार यात्रा डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या साताऱयातील निवासस्थानी पोहचली. या ठिकाणी शाहीर दिलिप सावंत यांनी त्यांना शाहिरी मुजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजार्षी शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डॉ. साळुंखे यांनी आपल्या वाणी-लेखनीतून तमाम मराठा आणि बहुजन समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साळुंखे यांच्या घरी शाहू स्मृती शताब्दीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी अध्यक्ष वसंतराव मुळीक, उपाध्यक्ष बबनराव रानगे यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांचा शाहूंचे चित्रमय चरित्र देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विचार जागर यात्रेचा हेतू इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी विशद केला. यवेळी विजय पाटील, अमित अडसुळे, मिलिंद पाटील, आदी उपस्थित होते.