पंचायत मंडळाचे सोयीस्कर दुर्लक्ष : डोंगरावरील बांधकामाविरोधात तक्रार
प्रतिनिधी /मोरजी
मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगर माळरानावर मोठय़ा प्रमाणात डोंगर कापून बेकायदा बांधकाम चालू असल्याची लेखी तक्रार मोरजी येथील मयुर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीकडे केली आहे. या बांधकामावर आणि डोंगर कापणी वर त्वरित कारवाई करावी असे तक्रारीत म्हटले आहे.
मोरजी पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक 245 / 8 245/2 424 124 /2 24 /4 या सर्वेमध्ये मोठय़ा प्रमाणात डोंगर कापणी आणि बेकायदा बांधकाम चालू असल्याची तक्रार मयुर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीला दिलेली आहे. दरम्यान पंचायत क्षेत्रातील किनारी भागातील मोठय़ा प्रमाणात जमिनी विकून संपल्यानंतर आता जमीन दलाल आणि दिल्ली व्यावसायिकांच्या नजरा डोंगर माळरानावर गेल्या असून, निसर्गाचा ऱहास करत मोठय़ा प्रमाणात दिल्लीतील अनेक हॉटेल मालक, उद्योजक, चित्रपट नगरीतील व्यावसायिक, क्रिकेटपटू यांनी डोंगर माळरानावरील जमिनी विकत घेतलेले आहेत आणि या जमिनी विकत घेऊन फार्महाउस नावाच्या खाली मोठ मोठे बंगले बेकायदापणे बांधलेले आहेत. त्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही. थेट त्यांचे हात केंद्र सरकार पर्यंत पोचल्याने केंद्र सरकारच्या सहकार्याने हे बेकायदा काम सुरू असल्याचे चित्र मोरजी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावर नजर मारल्यास दिसून येते.
मोरजी पंचायतीने डोंगर माळरानावर काय चालले आहे हे उघडय़ा डोळय़ांनी पहावे आणि आपला निसर्ग राखावा अशी मागणी मयूर शेटगावकर यांनी केली आहे. मयूर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीकडे 24 रोजी लेखी स्वरुपात या विरोधात तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन त्या जागेची पाहणी करून सध्या मोठय़ा प्रमाणात डोंगर कापणी आणि बेकायदा बांधकाम चालू असल्याचा दावा मयुर शेटगावकर यांनी केला आहे. ते बांधकाम तिथला गैर प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी मयूर शेटगावकर यांनी केली आहे.
पंचायतीकडे आज पर्यंत एकाही फार्महाऊस साठी ना हरकत दाखला किंवा साधा अर्ज आला नाही. परंतु त्या ठिकाणी अनेक फार्महाउस उभी आहेत ती कशा पद्धतीने उभी राहिली व कोणी त्यांना परवाने दिले हेही एक कोडेच आहेत, ते कोडेच आज पर्यंत सुटलेले नाही. डोंगर माळरानावरच्या ठिकाणी जमिनी घेतलेले आहेत ज्या ठिकाणी फार्महाउस उभारलेले आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी सहा मीटर रुंदीचा रस्ता ही मुख्य रस्त्यापासून नसल्याने या बांधकामांना कोणत्या पद्धतीने परवाना दिला जातो. हे स्थानिक पंचायतीला आणि नागरिकांनाही समजत नाही.
दरम्यान मोरजाई मंदिर परिसरात अशीच एक जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी निवासी घरे उभारण्याची योजना एका बिल्डरने आखली होती. आणि त्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता अरुंद असताना त्या ठिकाणी इमारती उभारण्यास टाऊन प्लानिंग ने कसा परवाना दिला याचाही शोध सध्या चालू आहे. त्या संदर्भात खास ग्रामसभा आयोजित करून या मेघा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे आणि तसा ठराव पंचायतीने संबंधित खात्याला पाठवलेला आहे
डोंगर माळरानावरील चाललेला हा गैरप्रकार त्वरित थांबवावा अन्यथा आपल्याला पुढील हालचाली करून न्यायालयापर्यंत हे प्रकरण न्यावे लागेल असा इशारा मयूर शेटगावकर यांनी दिला.