विदेशी चलन साठय़ामधून पैसे काढल्याचा परिणाम ः बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमध्ये विक्रीचा दबाव राहिल्याने चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स 866.65 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. यामध्ये विदेशी कोषांमधून सलगपणे पैसे काढण्यात आल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमती मजबूत राहिल्याने त्याचा परिणाम हा बाजारातील कामगिरीवर पडल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 866.65 अंकांनी घसरुन निर्देशांक 54,835.58 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 271.40 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,411.25 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, विप्रो, एचडीएफसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग घसरुन बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, स्टेट बँक आणि एनटीपीसीचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
वाढत्या व्याजदराची गुंतवणूकदारांना भीती
युरोपीयन शेअर बाजारात दुपारचे सत्र घसरणीसह बंद झाले आहे. तर अमेरिकन शेअर बाजारातही तिच स्थिती राहिली होती. एफओएमसी (फेडरल ओपन मार्केट कमिटी) च्या बैठकीनंतर बुधवारी अमेरिकन बाजारात तेजीचा माहोल दिसला होता. मात्र वाढत्या व्याजदराच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून याचे पडसाद आगामी काळातही पडण्याचे संकेत अभ्यासक यावेळी व्यक्त करत आहेत.
का घसरले समभाग?
बँक ऑफ इंग्लंड यांनी आपले व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेसह अन्य देशांमधून येणाऱया व्याजदर वाढीचा निर्णय व महागाईचा फटका गुंतवणूकदारांना बसण्याच्या भीतीने समभागात मोठय़ा प्रमाणात घसरण सत्र राहिल्याचे दिसून आले आहे.
याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.20 टक्क्यांनी वधारुन 113.3 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. तसेच शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून गुंतवणूकदारांकडून निव्वळ स्वरुपात 2,074.74 कोटी रुपयाच्या समभागांची विक्री झाली आहे.