वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या बहिऱयांच्या 24 व्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे धनुष श्रीकांत आणि प्रियेशा देशमुख यांनी नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या या नेमबाजांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात हे यश प्राप्त केले.
या स्पर्धेच्या सहाव्या दिवशी झालेल्या मिश्र सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठीच्या लढतीत धनुष श्रीकांत आणि प्रियेशा देशमुख यांनी जर्मनीच्या सेबॅस्टियन हर्मेनी आणि सॅब्रिना इकेर्ट यांचा 16-10 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेतील धनुषचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तेलंगणाच्या धनुषने पुरूषांच्या वैयक्तिक 10 मी. एअर रायफल नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळविले होते. हैदराबादमधील गगन नारंग अकादमीमध्ये धनुष्य प्रशिक्षण घेत आहे. या स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या अभिनव देसवालने पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले होते. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्णपदके मिळविली आहेत. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या वेदिका शर्माने कास्यपदक तसेच पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत शौर्य सैनीने कास्यपदक पटकाविले आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी भारताचा 65 जणांचा संघ सहभागी झाला असून त्यामध्ये 10 नेमबाजांचा समावेश आहे.