ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने देशातील पाच शहरांमध्ये असलेली आपली सुपर डेली सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (swiggy close super daily service in five cities) कंपनीला या सर्व्हिसमधून तोटा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
स्विगीचे सह-संस्थापक आणि सुपर डेलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फानी किशन एडेपल्ली यासंदर्भात बोलताना म्हणाले, स्विगी आपल्या सुपर डेली सर्व्हिस अंतर्गत फूड, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामानाची डिलिव्हरी करते. ही सर्व्हिस मिळवण्यासाठी ग्राहकांना अगोदर सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. या सर्व्हिसमुळे स्विगीला तोटा होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, आणि पुणे या मोठय़ा शहरांमधून आपली सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आव्हानात्मक काळात आपला खर्च आणि तोटा कमी ठेवण्यावर कंपनी भर देत आहे. त्यामुळे आजपासून (दि. 12) या शहरांमध्ये स्विगीची सुपर डेली सर्व्हिस मिळणार नाही. ज्या कस्टमर्सच्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक आहेत त्यांना सात दिवसात ते परत केले जातील.
बिझनेस रिकन्स्ट्रक्शनचा भाग म्हणून या पाच शहरांमधील सर्व्हिस आम्ही बंद करत आहोत. मात्र, बेंगळुरूमधील ही सबसक्रिप्शन सर्व्हिस पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. उलट ही सर्व्हिस वाढवण्यासाठी तिथे अधिकचे प्रयत्न केले जातील, असेही एडेपल्ली यांनी म्हटले आहे.