सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचे उद्गार
प्रतिनिधी/ फोंडा
माणसाचे जीवनमान उंचावण्याची व समाजाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता सहकार चळवळीत आहे. गोव्यात ज्या पद्धतीने सहकार क्षेत्राचा विकास व विस्तार होत आहे, ते पाहिल्यास भविष्यात गोवा राज्य सहकारातील एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतो. त्यासाठी मार्केटिंग युनिट, ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट व अन्य आवश्यक साधनसुविधा उभाराव्या लागतील. सहकार भारतीसह राज्यातील सहकारी संस्थांनी त्यादृष्टीने पुढे येण्याचे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
सहकार भारती गोवा प्रांताच्या सातव्या प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजीव गांधी कला मंदिरमध्ये शनिवारी हे एक दिवशीय अधिवेशन पार पडले. व्यासपीठावर सहकार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, माजी खासदार व गोवा बागायतदारचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर, फोंडय़ाचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कुठ्ठाळीचे आमदार ऍन्थोनी वाझ, सहकार भारती गोवाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, व्ही. पी. अर्बनचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वल्लभ साळकर, राजकुमार देसाई, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष स. का. मळीक व सहकार भारतीचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी रितेश नाईक यांच्याहस्ते सहकार ध्वज फडकाविण्यात आला व स्वयंसाहाय्य गटांच्या विविध वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
देशभरात सहकार हा एक उत्कृष्ट उद्योग मॉडेल म्हणून उभा राहत आहे. काही मोजक्याच संस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराकडे पाहून सहकाराबद्दल नकारात्मक मत तयार करता येणार नाही. एक विश्वासार्ह व यशस्वी क्षेत्र म्हणून त्याकडे पाहावे लागेल. सहकार क्षेत्रात महिलांच्या उद्यमशिलतेला प्रोत्साहन देतानाच गोव्यात सन् 2024 पर्यंत मार्केटिंग युनिट व येत्या सहा महिन्यात अद्ययावत प्रशिक्षण देणारे टेनिंग इन्स्टिटय़ूट उभारण्याचा मनोदय मंत्री शिरोडकर यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्र हे देशाचे भवितव्य ः दिनानाथ ठाकूर
आपल्या अध्यक्षीय भाषणात दिनानाथ ठाकूर यांनी सहकार क्षेत्र हे देशाचे भवितव्य असल्याचे सांगितले. देशातील बेरोजगारी, उर्जा, अन्नधान्य पुरवठा व सामाजिक सलोखा या मुख्य प्रश्नांवर सहकाराच्या माध्यमातून मात करणे शक्य आहे गोव्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती व सेवा क्षेत्राचा योग्य वापर करुन त्याला सहकारातील ज्ञान, आर्थिक गुंतवणूक व बाजार व्यवस्था या तीन गोष्टी जोड दिल्यास केवळ देशातच नव्हे तर जगभरात गोवा हे एक चांगले मॉडेल म्हणून विकसित करता येईल. त्यासाठी सहकार भारतीतर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिली.
सहकाराला तंत्रज्ञानाची जोड हवी ः सुभाष फळदेसाइ&
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, जग तंत्रज्ञानाच्या दिशेने झपाटय़ाने पुढे जात आहे. या तंत्रज्ञानाचे आकर्षण असलेली तरुण पिढी सहकार क्षेत्रात येणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाशिवाय सहकार चळवळीला योग्य गती मिळणार नाही. गोव्यातील सहकारात अनेक वर्षे काम करणाऱया जुन्या लोकांनी तरुणांच्या खाद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली पाहिजे. सहकार संस्थांशी सहकार खात्यातील कर्मचारी व अधिकाऱयांचा त्यासाठी योग्य समन्वय हवा.
सहकार ही सामान्य माणसाची चळवळ आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून राहण्यामागे सहकार हे प्रमुख कारण आहे, असे ऍड. नरेंद्र सावईकर म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्ये सहकार हे तत्व म्हणून प्राचीन काळापासून स्वीकारले गेले आहे. समाजातील प्रत्येक घटक या क्षेत्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जोडला गेलेला आहे. सहकार क्षेत्रापुढे आज अनेक आव्हाने असली तरी या चळवळीत ती पेलून पुढे जाण्याची ताकद आहे. विश्वासार्हता व पारदर्शकता हा सहकाराचा आत्मा जपला पाहिजे.
राज्यातील पहिल्या सहकारी संस्थेचा गौरव
प्रकाश वेळीप यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गोव्यातील सहकार चळवळीचा आलेख मांडला. 1963 साली स्थापन झालेली गोव्यातील पहिली सहकारी संस्था नगरगांव व्ही. के. एस. सोसायटीचा यावेळी गौरव करण्यात आला. आमदार ऍन्थोनी वाझ यांनाही सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. स्वागत राजकुमार देसाई यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हीपीके अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे यांनी केले. दिवसभर चाललेल्या या अधिवेशनात मंत्री सुभाष फळदेसाई यांचे ‘सहकार क्षेत्रातील तंत्रज्ञान’ या विषयावर भाषण झाले. सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांचे ‘सहकारी मार्केटिंग‘ या विषयावर मार्गदर्शन सत्र झाले. तसेच अन्य मान्यवरांची सहकारासंबंधी विविध विषयावर मार्गदर्शन सत्रे झाली. समारोप सत्रात विविध ठराव तसेच पुढील तीन वर्षांसाठी गोवा राज्य सहकार भारतीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.