ठेकेदारावर कारवाई करण्याची बांधकाम विभागाला निवेदन
प्रतिनिधी/कार्वे
मांडेदुर्ग येथील पुलाजवळ भराव चुकीच्या पध्दतीने आणि कमी टाकल्याने अपघातांचे प्रमाण वाढणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ प्रत्यक्ष कामाची पहाणी करून ठेकेदारावर कारवाई न केल्यास भविष्यात होणाऱ्या वित्त जीवितहानीला अधिकारी जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा प्रताप डसके यांनी दिला आहे.
मांडेदुर्ग येथे अत्यंत ढिसाळ पध्दतीने पूलाचे काम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. तो तेथीलच माती दोन्ही बाजूला टाकल्यामुळे ज्यादाची टाकली जाणारी माती वाचवून आपली स्वतची कमाई केली आहे. त्याचबरोबर ज्या पध्दतीने त्यावर रोलिंग करायला हवे होते. ते झालेले नाही. परिणामी काल झालेल्या पावसात जवळपास दीड फूट मातीभराव खचला आहे. आता खचलेल्या भरावावरच बीबीएम करून उर्वरीत बिल काढून घेण्यासाठी सदरच्या ठेकेदाराची धडपड सुरू आहे. यात बांधकाम कार्यालयाच या कामाच्या निरीक्षणात जाणूनबुजून दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सदरच्या ठेकेदाराला ज्यादाचा भराव आणि अन्य फ्लॅनमध्ये नमूद असलेलया बाबी रितसरपणे पूर्ण केल्याखेरीज या कामाचे उर्वरीत बील अदा करण्यात येऊ नये. शिवाय सदरचा ढिसाळपणा केलेला माती भराव येत्या पावसाळय़ात वाहून जाण्याची शक्यता आहे. हा भराव वाहून जाऊन त्याद्वारे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याला अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असतील, याची नोंद घ्यावी, आणि भविष्यातील झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांच्यावर रितसर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.