वृत्तसंस्था/ चेन्नई
44 वी बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धा येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाणार असून या स्पर्धेत विक्रमी 187 देशांचे 343 संघ सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱया संघांमध्ये पुरूष खुल्या विभागात 189 तर महिलांच्या विभागात 154 संघांनी आपली नोंद केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ क्षेत्रातील ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जात असून भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. सदर स्पर्धा खुल्या पुरूषांच्या आणि महिलांच्या अशा दोन गटामध्ये घेतली जाणार आहे. स्पर्धा आयोजकांकडे 187 देशांनी आपल्या संघांची नांवे नोंद केली आहेत. 2018 साली बुद्धिबळ ऑलिम्पियाड जॉर्जियामध्ये घेतली गेली होती आणि त्या स्पर्धेत खुल्या पुरूषांच्या विभागात 184 तर महिलांच्या विभागात 150 संघांनी (179) देशांचा विक्रमी सहभाग होता. भारतात होणाऱया या स्पर्धेत नॉर्वेचा विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसन प्रमुख आकर्षण राहील.
या स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱया भारताला खुल्या आणि महिलांच्या विभागात जादा आणखी एक संघ उतरविण्याची परवानगी मिळाली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय बुद्धिबळ संघांच्या मेंटरपदी माजी विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे अध्यक्ष संजय कपूर यांनी दिली आहे. या स्पर्धेत भारतातर्फे खुल्या आणि महिलांच्या विभागात प्रत्येकी दोन संघ सहभागी होणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.