योग्यप्रकारे उभारणी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशपूर ते बेळगाव दरम्यान मिलिटरी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर धोकादायक गतिरोधक उभारण्यात आले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱया नागरिकांना या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्यामुळे मोठी समस्या होत असून काही अपघातही घडले आहेत. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याची योग्यप्रकारे उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
अनैसर्गिकरित्या हे गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. या गतिरोधकांवर पांढरे पट्टे देखील ओढण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तेथील गतिरोधक सुस्थितीत करावेत, अशी मागणी या परिसरातून प्रवास करणाऱया नागरिकांतून केली जात आहे.
कॅन्टोन्मेंट अध्यक्षांच्या बंगल्यासमोर हे गतिरोधक उभारण्यात आले आहेत. बेळगाव ते राकसकोप या रस्त्याचे मागील वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर ठिकठिकाणी गतिरोधक उभारण्यात आले. या रस्त्यावरून वाहनधारकांची सतत ये-जा असते. तर काहीजण आपल्या कामावर वेळेत पोहोचण्यासाठी वाहने जोरात चालवत असतात. अचानक हे गतिरोधक लागल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील गतिरोधक हटवावेत, अशी मागणी येथील वाहनधारकांनी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून मी या रस्त्यावरून प्रवास करत आहे. मात्र या गतिरोधकांमुळे त्रास होत आहे. हे गतिरोधक उंच करण्यात आल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे मत नागेश माने यांनी व्यक्त केले आहे.