कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्णतः बंद : बाळंतिणींची संख्याही रोडावली
वार्ताहर /नंदगड
गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांना सेवा देणाऱया नंदगड येथील शासकीय दवाखान्यात गेल्या वर्षभरापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. प्रसूती विभागात भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. पाणी नसल्याने प्रसूतीसाठी येणाऱया रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरवली आहे.
नंदगड परिसरातील गावातील लोक वैद्यकीय उपचारार्थ नंदगड येथील दवाखान्यात येतात. सुरुवातीला हे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. 2012 साली या प्राथमिक केंद्राचा दर्जा वाढवून सामुदायिक आरोग्य केंद्र करण्यात आले. या दवाखान्यात पाच मुख्य डॉक्टरांची नियुक्ती आहे. पण त्यापैकी चार डॉक्टर कार्यरत आहेत. डॉक्टर वगळता इतर कर्मचाऱयांची संख्या साधारणतः 45 पर्यंत आहेत.
या दवाखान्यात यापूर्वी महिन्याकाठी पंचवीस ते तीस महिलांच्या प्रसूती होत होत्या. पण अलिकडे या दवाखान्यात पाण्याचा अभाव असल्याने केवळ पाच-दहा प्रसूती होणे कठीण होऊन बसले आहे. तर अलिकडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या दवाखान्याच्या परिसरात एक कूपनलिका होती. त्या कूपनलिकेला मोटार जोडून सदरचे पाणी दवाखान्यासाठी वापरण्यात येत होते. एक वर्षापासून सदर कूपनलिकेचे पाणी बंद झाल्याने दवाखान्याला पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्यासाठी ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनाही वारंवार येथील कर्मचाऱयांनाही विनंती केली. पण प्रत्येकजण या दवाखान्याला मुबलक पाणी पुरवण्याकडे दुर्लक्षच करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी समस्या गंभीर होत चालली आहे.