कोण्णूर येथे घटना : वडिलांच्या अनैतिक प्रकाराबद्दल जाब विचारल्याने कृत्य : पोलीस निलंबित
प्रतिनिधी / बेळगाव
कुलगोड पोलीस स्थानकातील पीएसआयच्या मुलावर घटप्रभा पोलीस स्थानकातील तीन पोलिसांनी हल्ला केला आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून वडिलांच्या अनैतिक प्रकारावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलिसांनी त्याची धुलाई केली आहे.
गोकाक तालुक्मयातील कोण्णूर येथे ही घटना घडली आहे. राहुल सिद्धाप्पा करनिंग (वय 32) असे जखमी तरुणाचे नाव असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. राहुलच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात पाच जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तीन पोलीस, श्रीदेवी करनिंग व सिद्धाप्पा करनिंग यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल हा सध्या बेळगाव येथे राहतो. त्याचे वडील सिद्धाप्पा हे कुलगोड पोलीस स्थानकात पीएसआय आहेत. वडिलांच्या अनैतिक प्रकाराबद्दल जाब विचारण्यासाठी तो कोण्णूरला गेला होता. त्यावेळी घटप्रभा पोलीस स्थानकातील तीन पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केला आहे.
काठी व लोखंडी रॉडने हल्ला केला असून भा.दं.वि. 143, 147, 148, 109, 324, 307, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल झाला आहे. हे प्रकरण जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यापर्यंत पोहोचले असून गंभीर दखल घेतली आहे. घटप्रभा पोलीस स्थानकातील शिवानंद पत्तार या पोलिसाला निलंबित केले असून आणखी दोघा जणांवर लवकरच कारवाई होणार आहे.