वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया व क्रिस्टिना म्लाडेनोविक यांनी एक सेटची पिछाडी भरून काढत अमेरिकेच्या कोको गॉफ व जेसिका पेगुला यांचा पराभव करून प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेचे त्यांचे हे दुसरे जेतेपद आहे. गॉफला मात्र एकेरीनंतर दुहेरीतही स्वप्नभंग झाल्याची निराशा सहन करावी लागली.
18 वर्षीय कोको गॉफला शनिवारी एकेरीच्या अंतिम फेरीत इगा स्वायटेककडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपद स्वीकारावे लागले होते. त्याचीच पुनरावृत्ती रविवारी दुहेरीतही झाली. गार्सिया-म्लाडेनोविक जोडीने गॉफ-पेगुला यांच्यावर 2-6, 6-3, 6-2 अशी मात करीत जेतेपद पटकावले. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. पेगुलासाठी मात्र पेंच स्पर्धेचे हे चौथे जेतेपद आहे. यापूर्वी 2019 व 2020 मध्ये टिमीया बॅबोससमवेत येथे तिने जेतेपद मिळविले होते. पेगुलाचे कारकिर्दीतील हे एकूण सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद असून 2018 व 2020 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
गॉफ-पेगुला या अमेरिकन जोडीने अंतिम फेरी गाठेपर्यंत फक्त एक सेट गमविला होता. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच त्यांची सर्व्हिस भेदली होती. पण त्यातून लगेच सावरत त्यांनी 3-1 अशी आघाडी घेतली. म्लाडेनोविकने एक व्हॉली नेटमध्ये मारल्यानंतर त्यांची आघाडी 4-2 अशी वाढली. आणखी एक ब्रेक मिळाल्यानंतर गॉफ-पेगुलाने नियंत्रण मिळविले. दुसऱया सेटपॉईंवेळी गार्सियाने एक फोरहँड दूरवर मारल्याने हा सेट गॉफ-पेगुलाने जिंकत आघाडी घेतली. या मोसमात दुसऱयांदा एकत्र खेळणाऱया गार्सिया-म्लाडेनोविक यांनी जोरदार मुसंडी मारत दुसऱया सेटमध्ये 4-0 अशी बढत मिळविली आणि नंतर म्लाडेनोविकने जोरदार स्मॅशवर हा सेट घेत बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्येही त्यांनी हा जोम कायम ठेवत 4-0 अशी आघाडी घेतल्यानंतर तिसऱया मॅचपॉईंटवर गार्सियाने विजयी स्मॅश मारत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
पुरुष दुहेरीत ऍरेव्हालो-रॉजेर अजिंक्य
एल साल्वादोरचा मार्सेलो ऍरेव्हालो व हॉलंडचा जीन ज्युलियन रॉजेर यांनी एकत्र खेळताना पुरुष दुहेरीचे पहिले ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावले. त्यांनी क्रोएशियाचा इव्हान डोडिग व अमेरिकेचा ऑस्टिन क्रायसेक यांचा पराभव केला. ऍरेव्हालो-रॉजेर यांनी डोडिग-क्रायसेक यांच्यावर चुरशीच्या लढतीत 6-7 (4-7), 7-6 (7-5), 6-3 अशी मात केली. ऍरेव्हालो व रॉजेर दोघांनीही जबरदस्त सर्व्हिसचे प्रदर्शन घडविले. मात्र विजयासाठी त्यांना तीन तास 3 मिनिटे संघर्ष करावा लागला. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा ऍरेव्हालो हा मध्य अमेरिकेचा (साल्वादोर) पहिलाच टेनिसपटू आहे. या जोडीने या मोसमात टूर लेव्हलवर तीन स्पर्धा जिंकल्या असून त्यात डल्लास ओपन, डेलरे बीच स्पर्धेचा समावेश आहे. 40 वर्षीय रॉजेर हा दुहेरीतील सर्वात वयस्कर ग्रँडस्लॅम चॅम्पियन असून त्याचे हे तिसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. यापूर्वी त्याने रोमानियाच्या होरिया तेकॉसमवेत खेळताना 2015 मध्ये विम्बल्डन व 2017 मध्ये अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळविले होते. ऍरेव्हालोने एकूण पाच टूर लेव्हलवर दुहेरीचे अज्ंिांक्यपद मिळविले आहे.
कनिष्ठ महिलांत हॅवलिकोव्हा विजेती
कनिष्ठ महिला गटात झेक प्रजासत्ताकची 17 टेनिसपटू वर्षीय ल्युसी हॅवलिकोव्हाने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने अर्जेन्टिनाच्या सोलाना सिएराचा केवळ 73 मिनिटांत 6-3, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत जेतेपद मिळविणारी ती झेकची पाचवी टेनिसपटू आहे. यापूर्वी रेनाटा तोमानोव्हा (1972), रेगिना मर्सिकोव्हा (1975), हॅना मंडलिकोव्हा (1978), लिडा नोस्कोव्हा (2021) यांनी ही स्पर्धा जिंकली होती.