गरजू-वंचित मुलांसाठी फौंडेशनचे कार्य अलौकिक : ‘स्कूल ऍण्ड लर्निंग सेंटर’जनसेवेत
प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी येथील महेश फौंडेशनने नव्याने बांधलेल्या हॉस्टेल इमारत आणि विजय पुसाळकर ‘स्कूल ऍण्ड लर्निंग सेंटर’चा उद्घाटन कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला. फौंडेशनच्या आवारातच हा कार्यक्रम झाला. गरजू आणि वंचित मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन उद्योजक विजय पुसाळकर यांचे सुपुत्र रोहन पुसाळकर यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर रामचंद्रराव, रोहन पुसाळकर, मेघा पुसाळकर, एम. एन. हंपीहोळी उपस्थित होते. प्रारंभी भरतनाटय़ सादर झाले. रोहन पुसाळकर यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रोपटय़ाला पाणी घालून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी रोहन पुसाळकर म्हणाले, समाजातील होतकरू, गरजू आणि वंचित मुलांसाठी महेश फौंडेशनने अलौकिक कार्य केले आहे. प्रतिकुल परिस्थितीतदेखील प्रेरणा, विश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर समाजातील वंचित घटकांसाठी मोठा हातभार लावला आहे. 2 हजाराहून अधिक मुले शिक्षण घेऊन बाहेर पडली आहेत. हीच या फौंडेशनच्या गौरव कार्याची पोचपावती असल्याचे सांगितले. यावेळी प्रास्ताविक करताना महेश जाधव म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूतून वयाच्या 21 व्या वषी या कार्याचा श्रीगणेशा केला आणि आजपर्यंत अनेक वंचित मुलांना शिक्षणाबरोबर स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी फौंडेशनच्या माध्यमातून कार्य केले आहे.
यावेळी मेघा पुसाळकर आणि रामचंद्रराव यांनीही मनोगत व्यक्त करताना महेश फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी फौंडेशनचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सृष्टी व निलम या विद्यार्थिनींनी केले.