वार्ताहर /हिंडलगा
गोजगा येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन घराच्या भिंती आणि कॉलम अज्ञातांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने पाडून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि. 14) रात्री घडले. याबाबत घरमालक विनोद लक्ष्मण बेळगावकर यांनी काकती पोलिसात फिर्याद दाखल केली
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गावापासून जवळच असलेल्या आपल्या शिवारात विनोद बेळगावकर हे नवीन घर बांधत आहेत. सध्या घराचे बांधकाम लिंटल लेव्हलपर्यंत आले आहे. पण, काही अज्ञातांनी पूर्ववैमनस्यातून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने नव्याने बांधण्यात आलेल्या भिंती व कॉलम कोसळून नुकसान केले आहे. सदर जागेबाबत न्यायालयात दावा सुरू असल्याचे समजते. पण, निकालापूर्वीच बांधण्यात आलेल्या घराचे बांधकाम कोसळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, बेळगावकर यांनी काही लोकांवर संशय व्यक्त करत काकती पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तसेच एका संशयित जेसीबीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.