‘साबांखा’चे अक्षम्य दुर्लक्ष, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे, वाहनधारकांत अपघाताची भीती
प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजी पुढील महिन्यात खड्डेमय बनणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अनेक भागात रस्त्याची चाळण होणे सुरू झाले आहे. एवढेच नव्हे तर पणजीतील दीड दोन माहिन्यांपूर्वी केलेल्या हॉटमिक्स रस्त्यांवरील तथाकथित डांबरही निघू लागल्याने जुलैमध्ये पणजीकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
पणजीतील अनेक रस्त्यांवर मारलेले चर, रस्त्याच्या बाजूला चर मारून त्यातून पाईप टाकल्यानंतर ते पुन्हा बुजविताना वरवर मलमपट्टी केल्यामुळे रस्त्याच्या बाजूला आता खड्डे पडायला प्रारंभ झाला आहे. या शिवाय रस्त्यावर आडवी चर मारून त्यातून जलवाहिनी वा विद्युतवाहिनी नेऊन त्यावर खडी मिश्रित डांबर टाकताना देखील गंभीरपणे दखल घेतली नव्हती. केवळ जनतेच्या डोळय़ाला पाणी लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांनी व अभियंत्यांनी केला. आता पाऊस सुरू होऊन केवळ आठ ते दहा दिवस झाले. राजधानी पणजीतील अनेक रस्त्यांवरील जे चर बुजविले होते त्यासाठी वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते हे उघड झाले. रस्त्याच्या बाजूने चर खोदून ते बुजविताना पावसाळय़ात तिथे खड्डा तर पडणार नाही ना ? याची देखील दखल घेतलेली नव्हती. त्यामुळे आता पावसाळा सुरू होताच रस्त्यावर आडवी मारलेली चर आणि बाजूला मारलेले चर यातून खळगे तयार झाले.
पहिल्या 10 दिवसांतच पणजीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली. अद्याप 4 महिने पाऊस पडायचा आहे. जुलैमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस पडत असतो. तोपर्यंत या खड्डय़ांवरून गाडय़ा जाताना वाहनांचे टायर धडदिशी खाली जातात. त्यातून रस्त्याच्या कडा तुटतात व खड्डय़ांची रुंदी वाढत जाते. त्यातून जुलैमध्ये पणजी शहर खड्डेमय बनणारे आहे.
सध्या 18 जून रस्त्यावरील हॉटमिक्सींग उखडायला सुरूवात झाली. या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली. सांतईनेज चर्च ते तिथून मिरामाराला जाणाऱया रस्त्यावर विशेषतः सरकारी वसाहतीसमोरील रस्त्यांवर सांतईनेज येथे अनेक खड्डे तयार झालेले आहेत. बांदोडकर रस्त्याच्या बाजूला जुन्या सचिवालयाच्या बाजूने बांदोडकर पुतळय़ासमोर एक लहान खड्डा उन्हाळय़ापासूनचा आहे. कंत्राटदाराने हा रस्ता खोदून त्यातून पाईप लाईन टाकल्यानंतर तो बुजविताना अर्धवट काम केले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याने त्याकडे कानाडोळा केला. आता तिथे खड्डा वाढला असून लहान मोठे अपघात सुरु झाले आहेत.
18 जून रस्त्यावरून खाली मार्केटकडे जाणाऱया रस्त्यावर आकाशभवन इथे एक मोठे विवर रस्त्यावर तयार झाले आहे. तिथे गंभीर अपघाताची शक्यता आहे. या रस्त्यावर देखील अनेक जे आडवे चर मारले ते बुजविताना सिमेंट देखील सारखे वापरले नसल्याने इथे खड्डे सुरू झाले आहेत. हॉटेल डेलमॅनसमोरील रस्त्याचे हॉटमिक्सींग केल्यास दोन महिने झाले आणि पाऊस सुरू झाल्यास दहा दिवस झाले. या रस्त्याची चाळण सुरु झाली आहे.
या परिस्थितीला जबाबदार कोण ? सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, अभियंता गांभीर्याने घेणार की नाही ? स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेल्या पणजीतील रस्त्यांचे काम म्हणजे डांबराला लाजवेल एवढा काळाकुट्ट भ्रष्टाचार आहे.