वृत्तसंस्था/ किंग्जस्टन (जमैका)
जमैकाची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू शेली ऍन प्रेजरने गुरूवारी येथे आपल्या ऍथलेटिक्स हंगामाला शानदार प्रारंभ करताना महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान पटकाविले. जमैका राष्ट्रीय ऍथलेटिक्स चॅम्पियन्सशीप स्पर्धेत प्रेजरने महिलांच्या 100 मी. धावण्याच्या हिटमध्ये 10.70 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले.
2022 च्या ऍथलेटिक्स हंगामामध्ये प्रेजर-प्राईसने यापूर्वी दोनवेळा महिलांच्या 100 मी. शर्यतीमध्ये सर्वात जलद वेळ (10.67 सेकंद) नेंदविली आहे. गेल्या आठवडय़ात पॅरीस येथे झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत प्रेजरने पहिले स्थान मिळविताना नजिकची प्रतिस्पर्धी तसेच 20 वर्षांखालील वयोगटातील विश्व दुहेरी चॅम्पियन धावपटू ब्रिना विल्यम्सला मागे टाकले. विल्यम्सने 10.98 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर केंबा नेल्सनने तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या उंच उडीमध्ये तृतीय मानांकित लेमारा डिस्टीनला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. तिने या क्रीडाप्रकारात 1.85 मी.चे अंतर नोंदविले. उंच उडी प्रकारात किंबर्ली विल्यम्सनने 1.88 मी. चे अंतर नोंदवित प्रथम स्थान मिळविले.