‘मेरा साया’ नामक 1966 च्या हिंदी चित्रपटातील ‘बरेली के बाजार में झुमका गिरा रे’ हे गाणे विलक्षण गाजले होते. आजही या गाण्याची गोडी टिकून आहे. पण हे गाणे नेमके कुठे लिहिले गेले होते? याचा पत्ता आजवर लागत नव्हता. तसेच हे सुचले कसे? हेदेखील समजत नव्हते. त्याचा शोध आता लागला आहे. या गाण्याची पार्श्वभूमी ज्या घरात तयार झाली होती, ते घर उत्तर प्रदेशातील बरेलीतच आहे, असे आता आढळून आले आहे.
प्रसिद्ध कवी आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचे पिता हरिवंशराय बच्चन आणि त्यांचे मित्र प्रसिद्ध कवी निरंकारदेव सेवक यांचे हे घर होते. ते त्यावेळी नऊ-दहा हजार चौरस फुटांचे मोठे घर होते. आता केवळ 1500 चौरस फुटांचे राहिले आहे. आता या घरात सेवक यांची सून पूनम सेवक या राहतात. त्या हरिवंशराय बच्चन आणि आपले सासरे यांच्या अनेक आठवणी सांगतात. त्या आठवणींमध्येच या गाण्याची पार्श्वभूमी आहे. सेवक कुटुंब स्वातंत्र्यानंतर लाहोरहून बरेली येथे आल्याचे त्या सांगतात. त्याआधी लाहोरमध्ये असताना 1941 मध्ये एकदा सहज त्यांचे कुटुंब गप्पा मारत असताना त्यांच्या एका नातेवाईक महिलेने आपला झुमका (कर्णफूल) बरेलीच्या बाजारात खाली पडला, असे सहज बोलता बोलता सांगितले. नंतर हे सांगणाऱया तेजी यांच्याशी हरिवंशराय बच्चन यांचा विवाह झाला. त्यानंतर ते बरेलीतील या घरात रहावयास आले. याच घरात हे गाणे नंतर रचले गेले, असे सेवक यांचे म्हणणे आहे. मात्र, या गाण्याचा स्रोत एक मराठी लावणी आहे, असेही सांगितले जाते. ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱयाला’ या गाण्यावरून हे हिंदी गाणे सुचले, असेही बोलले जाते.