नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये तालिब हुसेन नामक लष्करे तोयबाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. हुसेन हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत असून भाजप नेत्यांच्या सोबतची त्याची छायाचित्रे विरोधी पक्षांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तथापि, त्याचा भाजपशी संबंध नसल्याचा खुलासा पक्षाकडून करण्यात आला. त्याच्यावर एनआयए ने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपने केली आहे. विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोपही केला.
काही समाजविरोधी लोक हेतुपुरस्सर भाजममध्ये येतात. आपण भाजपचे कार्यकर्ते असल्याचे भासवितात. तथापि, त्यांचा उद्देश संघटना बदनाम करण्याचा असतो. अशा लोकांनी समाजविरोधी कृत्य केल्यास भाजपवर टीका केली जाते., तथापि एकादी व्यक्ती गुन्हेगार किंवा दहशतवादी आहे की नाही, हे आधी समजू शकत नाही. त्यामुळे काही अशा काही व्यक्ती भाजपचे कार्यकर्ते म्हणून समाजात वावरु शकतात. मात्र, त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर पक्ष त्यांची पाठराखण करत नाही. तालिब हुसेन याच्या संदर्भात असा प्रकार घडला आहे. तो दोषी असून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तालिब हुसेन हा पाकप्रशिक्षित दहशतवादी असल्याचा पुरावा मिळाला असून त्याच्याविरोधात शक्य तितकी कठोर कारवाई करावी, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले.
काँगेसचा आरोप
तालिब हुसेन याचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप काँगेसने केला आहे. भाजप नेत्यांसोबतची त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. भाजप दहशतवादाविरोधात लढण्याचा आव आणत असला तरी त्याचा आतून देशविरोधी शक्तींशी संबंध आहे, असा आरोप युवक काँगेसच्या एका नेत्याने केला. तथापि, भाजपच्या बुधवारच्या स्पष्टीकरणानंतर वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.