दरवाढीने गृहिणींची प्रतिक्रिया : सर्वसामान्यांना महागाईचा चटका
प्रतिनिधी /बेळगाव
पेट्रोल-डिझेलच्या किमतींबरोबर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. शिवाय सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसला आहे. वर्षभरात सातत्याने गॅस सिलिंडरची किंमत वाढत असल्याने गोरगरिबांचा स्वयंपाक अडचणीत आला आहे. त्यामुळे आपली पारंपरिक चूलच बरी, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य गृहिणींतून व्यक्त होत आहेत.
इंधन दरवाढीबरोबर खाद्यतेल, दूध, भाज्या, फळे, धान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ गॅसची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. वर्षभरात 218 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने गोरगरीब जनतेला चुलीचा आधार घ्यावा लागणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात कमर्शियल गॅस दरात 200 रुपयांची कपात झाली होती. मात्र अवघ्या आठवडाभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. मात्र योजनेतील लाभार्थ्यांचा अपवाद वगळता बहुतांशी गॅस ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान मिळत नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. शासनाकडून गॅस सिलिंडर मिळाले. मात्र गॅस भरून घेताना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आधीच महागाईच्या कचाटय़ात जनतेची होरपळ होत असतानाच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
आर्थिक बजेट कोलमडले
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पुन्हा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. शिवाय गॅस भरून घेण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गॅस भरून घेण्यासाठी 1062 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
– शिल्पा पाटील (गृहिणी)