इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा धाकटा पुत्र सुलेमान शाहबाज याला आरोपी असे संबोधले आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर पाकिस्तानी न्यायालयाने सुलेमान शाहबाजसह अन्य एका व्यक्तीला फरार घोषित केले. लाहोर येथील विशेष न्यायालयाने सुलेमान शाहबाज आणि ताहिर नक्वी यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोघेही न्यायालयासमोर न आल्यामुळे त्यांना फरार घोषित केले.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुले हमजा आणि सुलेमान यांच्याविरुद्ध नोव्हेंबर-2020 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 28 मे रोजी न्यायालयाने सुलेमान आणि नक्वी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यावर ते ब्रिटनला पळून गेले. याच सुनावणीत न्यायालयाने मलिक मकसूद उर्फ मकसूद छपरासी या आणखी एका संशयिताला अटक वॉरंट जारी केले होते. मलिक मकसूदचे गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये निधन झाले.
11 जून रोजी एफआयएने सुलेमान, नक्वी आणि मकसूद यांच्यासाठी जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटबाबत अहवाल सादर केला. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सुलेमान आणि नक्वी यांच्या मालमत्ता तसेच मकसूदच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती मागितली. सुनावणीला उपस्थित राहण्यापासून एकवेळ सूट देण्याची पंतप्रधान शाहबाज यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली आहे, परंतु पुढील सुनावणीत त्यांनी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 30 जुलैला होणार आहे.
सुलेमान शाहबाजच्या तपासात 28 बेनामी खाती उघडकीस आली होती. 2008 ते 2018 या काळात या खात्यांद्वारे 1400 कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आले आहेत. सदर व्यवहार शाहबाजच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. एफआयएने पैसे शोधण्यासाठी 17,000 व्यवहारांची चौकशी केली.
इम्रान खानलाही दणका
दुसरीकडे, पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटने शुक्रवारी समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासह सर्वोच्च पीटीआय नेतृत्वावर पाकिस्तानच्या घटनेच्या कलम 6 अन्वये देशद्रोहाची कारवाई करावी का, यावर समिती विचार करेल. लवकरच ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.