कथित ईशनिंदेने भडकले कट्टरवादी ः घर अन् मंदिरांची जाळपोळ
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात धार्मिक कट्टरवाद्यांच्या जमावाने नरेल येथील लोहागरामध्ये हिंदूंची घरे तसच मंदिरांवर हल्ले केले आहेत. एका हिंदू युवकाकडून कथितरित्या करण्यात आलेल्या ईशनिंदेमुळे हा जमाव हिंसक झाला होता. या हिंसेच्या चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिघोलिया गावात अनेक हिंदू घरांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे पोलीस निरीक्षक हरन चंद्र पॉल यांनी सांगितले.
तर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट अपलोड करणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे. परंतु हिंदूंच्या घरांवर हल्ले करणाऱयांपैकी कुणालाच अटक झालेली नाही. याप्रकरणी तपास सुरू असून हिंसेसाठी जबाबदार लोकांवर कारवाई केली जाणार आहे. स्थिती सध्या नियंत्रणात असल्याचा दावा नरेलचे पोलीस अधीक्षक प्रबीर कुमार रॉय यांनी केला आहे.
यापूर्वी 18 जून रोजी नरैल जिल्हय़ात एका महाविद्यालयाच्या हिंदू प्राचार्याला गळय़ात चप्पलांचा हार घालण्यास भाग पाडले गेले होते. या घटनेवेळी स्थानिक पोलीस अधिकारीही उपस्थित होते. तर काही महिन्यांपूर्वी ढाका येथील इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर कट्टरवाद्यांनी हल्ला करत तोडफोड केली होती. 2013-21 पर्यंत बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करत 3,600 हल्ले झाले आहेत. या 8 वर्षांदरम्यान हिंदूंच्या विरोधातील हल्ल्यांमध्ये 550 हून अधिक घरे आणि 440 दुकाने तसेच व्यवसायांना लक्ष्य करण्यात आले. तर हिंदू मंदिरे, मूर्ती आणि पूजास्थळांमध्ये तोडफोड तसेच जाळपोळीच्या 1,670 हून अधिक घटना घडल्या आहेत.