उपजिल्हा संघटक संभाजी पाटील यांची माहिती
AadityaThackeray- शिवसेनेतील बंडाळीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Uddhav Thackeray)यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. सोमवारी १ ऑगष्ट रोजी ते दुपारनंतर कोल्हापूर (kolhapur district) जिल्ह्यात येत असून सायंकाळी त्यांची तोफ आजरा (ajara) व कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे धडाडणार आहे. दुपारी ३ वाजता आजऱ्यातील धर्मवीर संभाजी चौकात आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपाजिल्हा संघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत यांनी दिली.
शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायऊतार व्हावे लागले. राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. येथील स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर शिंदे यांच्यासोबत राहीले. त्यामुळे आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून आबिटकर यांच्या निषेध केला होता. त्यांच्या फोटोला काळे फासले होते. राज्यात शिवसेनेत बंडाळी होऊन अनेकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केला. पण आजरा तालुक्यातील शिवसेना मातोश्रीशी एकनिष्ठ राहीली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या आजऱयात होणाऱया सभेला महत्व प्राप्त झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर आदित्य ठाकरे सोमवारी येत असून तेथील सभा आटोपल्यानंतर ते आजरा येथे येणार आहेत. आजऱयात दुपारी 3 वाजता त्यांची सभा होणार आहे. आजऱयातील सभा आटोपून ते कोल्हापूर येथील सभेसाठी जाणार आहेत. सोमवार दि. १ रोजी आजरा येथे ठाकरे यांची होणारी सभा यशस्वी करण्यासाठी रविवार दि. २ जुलै रोजी सकाळी 10 वाजता आजरा येथील शिवसेना शाखा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शिवसेनेतील तालुका पदाधिकाऱयांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत यांनी केले आहे.