दोन्ही हेडिंग्स वापरावीत, अशी संपादकांची सूचना आहे. : जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटीची मोठी कामगिरी,एसआयटी बनली अधिक आक्रमक,लवकरच होणार आणखी अटक
प्रतिनिधी /पणजी
राज्यात मोठय़ा प्रमाणात चर्चेत असलेल्या जमीन घोटाळाप्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या एसआयटी पथकाने तीन मास्टर माईंड संशयितांना अटक केली आहे. उलट तपासणी केली असता त्यांनी गोव्यातील काही राजकारण्यांची नावे उघड केली आहेत. ठोस पुरावे मिळविल्यानंतर त्या राजकारण्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ओमविर सिंग यांनी दिली आहे. तिन्ही संशयितांनी 95 जमीन प्रकरणातील सुमारे 2 लाख चौ. मी. किनारी भागातील जमीन बेकायदेशीररित्या बळकाविली आहे, असेही सिंग यांनी सांगितले.
काल शुक्रवारी संध्याकाळी रायबंदर येथील सीआयडीच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी वरील माहिती दिली. त्यांच्या सोबत अधीक्षक विल्सन निधीन, उपअधीक्षक संतोष देसाई, उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू व अन्य मान्यवर उपस्थित होते.
तिघांनी बळकाविली दोन लाख चौ. मी. जमीन
अटक केलेल्या संशयितांमध्ये रॉयसन रॉड्रिग्स, सँड्रिक फर्नांडिस, राजकुमार संतोष मायथी यांचा समावेश आहे. राज्यातील जमीन घोटाळ्यात हे तिन्ही मुख्य संशयित आहेत. रॉयसन याने 26 जमीन प्रकरणात 64 हजार 782 चौरस मीटर जमीन बेकायदेशीररित्या बळकावली आहे. राजकुमार मायथी याने 61 जमीन प्रकरणात 1 लाख 30 हजार 425 चौरस मीटर जमीन बळकाविली आहे. त्यापैकी काही प्रमाणात जमीन त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे केली आहे.
तिघेही जमीन घोटाळय़ातील प्रमुख सूत्रधार
राज्यातील किनारी भागातील जमिनींची बनावट कागदपत्रे करून त्या जमिनी बळकावणारे रॅकेट कार्यरत असून त्यातील अटक केलेले हे तिन्ही संशयित प्रमुख आहेत.
रॉयसनच्या मुसक्या आवळल्या मुंबई विमानतळावर
या त्रिकुटातील रॉयसन रॉड्रिग्स हा अधिकाधिक काळ परदेशात असतो. राज्यातील जमीन घोटाळा प्रकरण उघडकीस येत असल्याचे समजताच त्याने विदेशातच तळ ठोकला होता. तो भारतात येणार असल्याची माहिती एसआयटीला मिळताच एसआयटीच्या पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉयसन याला अटक केली. इतर दोघांना त्याच्या घरांतून अटक करण्यात आली आहे. तिन्ही संशयितांच्या विरोधात 465, 466, 467, 468, 471, 419, 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आतापर्यंत जामिनावर सुटलेल्यांना पुन्हा होऊ शकते अटक
राज्यातील सात जमीन घोटाळा प्रकरणात आत्तापर्यंत एसआयटीने 15 संशयितांना अटक केली आहे. यातील दोघे पुराभिलेख पुरातन खात्यातील कर्मचारी आहेत. अटक केलेल्या संशयितांपैकी काही संशयितांची जामिनावर सुटका झाली असली तरी त्यांचा इतर जमीन घोटाळा प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आल्यास त्यांना पुन्हा अटक करण्यात येणार असल्याचेही आयजीपीनी सांगितले.
त्रिकुटाने हणजूण येथे केला जमीन घोटाळा
मूळ गोमंतकीय असलेले, सध्या मुंबईत वास्तव्य असलेले झेव्हिय रुझारियो परेरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत रॉयसन याला अटक करण्यात आली आहे. हणजूण येथील सर्वे क्रमांक 493/2 या जमिनीची संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती कागदपत्रे खरी असल्याचे सांगून मामलेदार कार्यालयात सादर करुन जमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. अटक केलेल्या संशयितांनी बोगस पध्दतीने बळकावलेल्या जमिनीपैकी काही जमीन विकून टाकली आहे. त्यामुळे संशयितांनी कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला आहे.
संशयित रॉयसन रॉड्रिग्स याला तक्रार क्रमांक 58/2022 मध्ये अटक केली आहे. राजकुमार संतोष याला तक्रार क्रमांक 66/2022 मध्ये अटक करण्यात आली आहे. सँड्रिक फर्नांडिस याला तक्रार 24/2022 मध्ये अटक करण्यात आली आहे. तिन्ही संशयितांना जामीन मिळणार नाही, यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली असून पोलिसांवर कोणताही दबाव नाही. जमीन घोटाळा प्रकरणातील प्रत्येक संशयिताला अटक करण्यात येणार आहे. ज्यांच्या जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे त्यांनी एसआयटीशी संपर्क करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन आयजीपीनी केले आहे.
जमीन घोटाळय़ातील राजकारणी कोण?
राज्यातील या जमीन घोटाळाप्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक झाली आहे. त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक राजकारण्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. अटक केलेल्या संशयितांनी काही राजकारण्यांची नावेही स्पष्टपणे उघड केली असल्याने त्या राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. अद्याप पोलिसांकडे ठोस पुरावे नसल्याने पोलीस त्या राजकारण्यांपर्यंत पोचलेले नाहीत, लवकरच पुरावे गोळा करून त्या राजकारण्यांना अटक केली जाईल, असे आयजीपी ओमवीर सिंग यांनी सांगितले. आयजीपींच्या या माहितीमुळे राज्यात खळबळ माजली असून जमीन घोटाळय़ातील राजकारणी कोण? याबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे.