हर्षवर्धन राणे अन् सोनिया राठीचा चित्रपट
हर्षवर्धन राणे अन् सोनिया राठी यांचा चित्रपट ‘तारा व्हर्सेस बिलाल’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अभिनेता तसेच निर्माता जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर जाहीर करत कलाकारांचा फर्स्ट लुक सादर केला आहे.
एका पोस्टरमध्ये हर्षवर्धन राणे बाइकवर बसून पोझ देताना दिसून येतो. तर सोनिया राठी ही तारा या व्यक्तिरेखेच्या स्वरुपात पोस्टरमधून भेटीस आली आहे. या चित्रपटाची कहाणी दोन विरुद्ध मानसिकता असणाऱया तारा आणि बिलाल यांच्या संघर्षाला दर्शविणारी आहे. समर इक्बाल यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती जॉन अब्राहमचे प्रॉडक्शन हाउस जेए एंटरटेन्मेंट, टी-सीरिज आणि टीव्हीबी फिल्म्सने मिळून केली आहे.
जॉनने यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचा हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत. संदीप लेजेल आणि शोभना यादव यांच्याकडून निर्मित या चित्रपटाची कथा रितेश शाह आणि ललित मराठे यांनी लिहिलेली आहे. जॉन लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर मानुषी छिल्लरसोबत तो ‘तेहरान’मध्ये काम करत आहे.