1 रोजी सलामीची लढत लेकंविरुद्ध, पाकविरुद्धची लढत 7 ऑक्टोबर रोजी
वृत्तसंस्था/ मुंबई
बांगलादेशमधील सिल्हेट येथे खेळविल्या जाणाऱया एसीसी आशिया चषक महिला टी-20 चॅम्पियनशिपसाठी भारतीय महिला निवड समितीने संघाची बुधवारी घोषणा केली. ही स्पर्धा 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
हरमनप्रीत कौरकडेच या संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून शफाली वर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकुर, राधा यादव, केपी नवगिरे या प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहेत. तानिया भाटिया, सिमरन दिल बहादुर यांना राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले आहे.
आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी महिलांच्या आठव्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून 1 ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होईल. एकूण सात संघांत जेतेपदासाठी चुरस लागेल. या स्पर्धेची अंतिम लढत 15 ऑक्टोबरला होईल. त्यात भारत, पाकिस्तान, लंका, थायलंड, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश यांचा सहभाग असेल. यातील सर्व सामने बांगलादेशमधील सिल्हेट येथे खेळविले जातील.
भारताची सलामीची लढत 1 ऑक्टोबर रोजी लंकेविरुद्ध होईल. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. राऊंड रॉबिन फेरीत भारताचे एकूण सहा सामने होतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील संघ निश्चित होतील. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल अशी अपेक्षा केली जात आहे. सात संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असून सर्व सामन्यांसाठी महिला पंच व सामनाधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचे जय शाह यांनी सांगितले.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय महिला संघ ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सब्बिनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकुर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, केपी नवगिरे. राखीव ः तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादुर.
भारत-पाक महिलांची लढत 7 ऑक्टोबर रोजी
आशिया चषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्ध भारताची लढत 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने सामने झाल्यानंतर पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळतील. तालिबानने ताबा घेतल्यामुळे अफगाणचा महिला प्रिकेट संघ आस्तित्वात नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा महिला संघ यात खेळताना दिसणार नाही. भारताच्या अन्य लढती मलेशिया (3 ऑक्टोबर), यूएई (4 ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध होतील. यजमान बांगलादेशविरुद्ध भारताची लढत 8 ऑक्टोबरला, थायलंडविरुद्ध शेवटची राऊंड रॉबिन लढत 10 ऑक्टोबर रोजी होईल. उपांत्य लढती 11 व 13 रोजी आणि अंतिम लढत 15 रोजी होईल.