वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार तसेच 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघातील सदस्य दिलीप तिर्कीची शुक्रवारी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप तिर्कीसह अन्य दोन व्यक्तींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण प्रत्यक्षात मतदानापूर्वीच या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने दिलीप तिर्कीची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये नावाजलेल्या अव्वल ऑलिम्पिक हॉकीपटूंच्या यादीमध्ये दिलीप तिर्कीचा समावेश केला जातो. तिर्कीने आपल्या पंधरा वर्षांच्या हॉकी कारकीर्दीमध्ये विक्रमी 412 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. 44 वषीय दिलीप तिर्कीने 1996 च्या ऍटलांटा, 2000 च्या सिडनी आणि 2004 च्या ऍथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत ओडिशा राज्याकडून भारताचे प्रतिनिधित्व केले होते. प्रत्यक्षात हॉकी इंडियाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 9 ऑक्टोबरला आयोजित केला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने हॉकी इंडियाला निवडणुकीची प्रक्रिया 9 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला होता.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे प्रमुख कार्यालय लुसाने येथे आहे. या कार्यालयातून हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या दिलीप तिर्कीचे खास अभिनंदन करणारे पत्र पाठविण्यात आले आहे. हॉकी इंडियाच्या उपाध्यक्षपदी हॉकी जम्मू-काश्मीरच्या उपाध्यक्षा असीमा अली, तसेच हॉकी कर्नाटकाचे एस. व्ही. एस. सुब्रमण्य यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हॉकी झारखंडचे भोलानाथ सिंग यांची सरचिटणीसपदी तर हॉकी तामिळनाडूचे शेखर मनोहरन यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.