केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण
वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात आले आहे. बुधवारपासून याला ‘शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने ओळखले जाणार आहे. याच्या नावात पंचकुला तसेच मोहालीचे नाव जोडण्यात आलेले नाही. बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या नामफलकाचे अनावरण केले आहे.
नामकरण सोहळय़ावेळी केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंह यांच्यासह खासदार किरण खेर, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला आणि मंत्री अनिल विज यांच्यासह दोन्ही राज्यांचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय तसेच बी. एल. पुरोहित उपस्थित होते. नाव बदलण्यात आल्याने विमानतळाच्या नामकरणावरून पंजाब आणि हरियाणा सरकारदरम्यान मागील 7 वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी या विमानतळावरून अमेरिका आणि कॅनडासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री मान आणि राज्यपाल बी.एल. पुरोहित एकाच व्यासपीठावर आले होते. परंतु, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद दिसून आलेला नाही. पंजाब विधानसभेचे अधिवेशन आयोजित करण्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. तर पंतप्रधान मोदींनी 25 सप्टेंबर रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमात चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा केली होती