गोवा टीएमसी समन्वयक समिल वळवईकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोमेकॉमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसटी, एसी व ओबीसीसाठी जागांचे जेवढे आरक्षण ठरले आहे तेवढय़ा जागांवर वरील तिन्ही मागासवर्गीय गटांतील युवकांना प्रवेश मिळायला हवा, अशी मागणी गोवा टीएमसी पक्षाचे संयुक्त समन्वयक समिल वळवईकर यांनी काल गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे एसटी, एससी विभागाचे समन्वयक संतोष मांद्रेकर आणि प्रवक्ता जयेश शेटगावकर उपस्थित होते.
वळवईकर यांनी सांगितले की गेली 15 वर्षे मागासवर्गीय अनेक विद्यार्थ्यांना गोमेकॉत प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. ते विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. गोमेकॉत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱया वरील तिन्ही मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी प्रवेश मिळणे हा त्यांचा अधिकार असून तो त्यांना सरकारने द्यायला हवा.
राज्यातील भाजप सरकारच्या अपयशामुळे या मागासवर्गीय अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. गोव्यातील युवा वर्गामध्ये त्यामुळे नाराजी आहे.
सध्या आहेत 49 जागा राखीव
पुढे माहिती देताना वळवईकर म्हणाले की आपल्या माहितीनुसार गोमेकॉत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण 49 जागा एसटी, एसी व ओबीसीसाठी राखीव असून त्यातील प्रत्येकाला अनुक्रमे 12 टक्के, 2 टक्के व 27 टक्के जागा आहेत. या निश्चित असलेल्या कोटय़ाप्रमाणे सरकारने या जागा भरायला हव्यात, अशी टीएमसी गोवाची मागणी आहे.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
मुख्यमंत्र्यांनी या युवकांची मागणी व अधिकार यांची दखल घेऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या गोष्टीचे महत्व ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्वरित यासंबंधीच्या नियमांत दुरुस्ती करुन या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी निर्णय घ्यावा, असेही वळवईकर म्हणाले.